अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ऊरूण ईश्वरपूरात भव्य दिव्य मिरवणूक; राज्यभरातील संत-महंत, मान्यवरांची उपस्थिती
अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ऊरूण ईश्वरपूरात भव्य दिव्य मिरवणूक; राज्यभरातील संत-महंत, मान्यवरांची उपस्थिती

उरूण ईश्वरपूर (प्रतिनिधी): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त ऊरूण ईश्वरपूर येथे शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यास महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री डॉ. आण्णासाहेब डांगे, खासदार रामराव वडकुते, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यभरातील २१ संत-महंत उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे व युवक नेते सागरभाऊ मलगुंडे यांनी दिली.
धनगर समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव आणि समाजातील एकात्मता दृढ करण्याच्या उद्देशाने या भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता तहसील कार्यालय परिसरातून मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ होणार असून शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक मार्गक्रमण करणार आहे.
ऐतिहासिक मार्गावरून मिरवणूक
तहसील कार्यालयातून सुरू होणारी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, यल्लामा चौक, गांधी चौक, लाल चौक, गणेश भाजी मंडई, डॉ. आण्णासाहेब डांगे चौक मार्गे शिराळा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाईल. याठिकाणी मिरवणुकीचा समारोप होणार आहे.
हत्ती, घोडे, उंटांसह आकर्षक रथ ठरणार मुख्य आकर्षण
या मिरवणुकीत हत्ती, घोडे आणि उंटांचा समावेश असणार असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी विशेष आकर्षक रथ तयार करण्यात आला आहे. यासोबतच अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावर आधारित पाच जिवंत देखावे सादर केले जाणार आहेत. धनगरी ढोल, हालगी घुमके, सनई-पिपाणी, ब्रॉस बँड तसेच देशपातळीवर प्रसिद्ध असलेले गज नृत्य आणि महिला-मुलींच्या सहभागातून सादर होणारे गज नृत्य मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
राज्यभरातील संत-महंतांची उपस्थिती
धनगर समाजाचे विविध श्रद्धास्थान आणि देवस्थानांशी संबंधित संत-महंत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कर्नाटक, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आदी भागांतील विविध देवस्थानांचे पुजारी, धर्मगुरू, भाकणूककार आणि समाजातील मान्यवर उपस्थित राहून समाजबांधवांना दर्शन देणार आहेत. त्यामुळे या मिरवणुकीला धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक असे त्रिविध स्वरूप प्राप्त होणार आहे.
गावांत जनसंपर्क मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जयंती उत्सवानिमित्त वाळवा तालुक्यातील धनगर समाजाचे वास्तव्य असलेल्या ५६ गावांमध्ये व्यापक जनसंपर्क दौरा राबविण्यात आला असून या दौऱ्यास समाजबांधवांसह विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे आयोजकांनी सांगितले. या माध्यमातून जयंती उत्सवाबाबत जनजागृती करण्यात येत असून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पिवळ्या वेशभूषेत सहभागी होण्याचे आवाहन
मिरवणुकीचे वैभव अधिक वाढविण्यासाठी पुरुषांनी पिवळ्या रंगाचा शर्ट तर महिलांनी पिवळ्या रंगाची साडी परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणा सज्ज
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांच्या नेतृत्वाखाली सर्व यंत्रणा कार्यरत असून माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे (बापू), सागरभाऊ मलगुंडे, अभिजित रासकर, प्रकाश कणप, दत्तात्रय तांदळे, संताजी मेटकरी, अॅड. उमेश कोळेकर, शाहिर सागर माने यांच्यासह अनेक कार्यकर्ते व समाजबांधव तयारीत सहभागी झाले आहेत.
धनगर समाजाच्या ऐक्याचे शक्तिप्रदर्शन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित हा सोहळा केवळ जयंती उत्सव न राहता धनगर समाजाच्या सांस्कृतिक परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक ऐक्याचे भव्य शक्तिप्रदर्शन ठरणार असल्याने संपूर्ण परिसराचे लक्ष या मिरवणुकीकडे लागले आहे. विशेष म्हणजे राज्यभरातील संत-महंत, लोकप्रतिनिधी आणि हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीमुळे ऊरूण ईश्वरपूर येथे अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
